PF Withdrawal Extra नोकरदारांसाठी भविष्य निर्वाह निधी हा निवृत्तीनंतरचा सर्वात मोठा आर्थिक आधार मानला जातो. सेवा काळात दरमहा वेतनातून पीएफपोटी कापले जाणारे पैसे निवृत्तीनंतर हातात येतात, तेव्हा नोकरदाराला सेवेचे समाधान लाभते; मात्र यादरम्यान आर्थिक अडचण आल्यास कर्मचार्याला पीएफमधील काही रक्कम नियमानुसार काढता येते. याप्रमाणे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे.
कर्मचारी वैद्यकीय आणीबाणीसाठी पीएफ खात्यातून एक लाखांपर्यंत आगाऊ रक्कम काढू शकणार आहेत. पूर्वी ही मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत होती आणि या मर्यादेत दुपटीने वाढ केली. ही सुविधा फॉर्म 31 नुसार देण्यात आली आहे आणि त्याचा उल्लेख 16 एप्रिल 2024 च्या अधिसूचनेत करण्यात आला आहे.
पॅरा 68 जे काय?
पॅरा 68 या नियमानुसार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वैद्यकीय खर्चासाठी काही प्रमाणात पीएफमधून पैसे काढता येणे शक्य आहे. एक महिना किंवा त्यापेक्षा अधिक काळ रुग्णालयात भरती असणे, मोठी शस्त्रक्रिया, कर्करोग, क्षयरोग, अर्धांगवायू यांसारख्या गंभीर आजारांवरील उपचारांपोटी येणार्या खर्चासाठी पीएफमधून पैसे काढता येतील. कर्मचार्यांच्या पीएफ खात्यात पुरेशी रक्कम असेल, तर तो एक लाखांपर्यंत रक्कम काढू शकतो. खात्यात कमी पैसे असतील, तर उपलब्ध रकमेच्या आधारावर पैसे काढता येणे शक्य आहे.
फॉर्म 31 मधून पैसे काढण्याची प्रक्रिया
‘ईपीएफओ’च्या फॉर्म 31 प्रमाणे विवाह, घराचे बांधकाम, खरेदी करणे, वैद्यकीय खर्च यांसारख्या आवश्यक बाबींसाठी पीएफचा पैसा वापरता येतो. यासाठी कर्मचार्याला कंपनी आणि डॉक्टरांकडून साक्षांकित प्रमाणपत्र घ्यावे लागेल आणि यात संभाव्य खर्चाचा उल्लेख असतो.
ईपीएफओची नवी ऑनलाईन सुविधा : ‘ईपीएफओ’ने युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) ची सुविधा सुरू केली आहे. याप्रमाणे कर्मचारी आता थेट ऑनलाईन दावा करू शकतात. यासाठी आपल्याला यूएएन नंबरला ‘आधार’ आणि बँक खात्याशी जोडणे गरजेचे आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ऑनलाईन पैसे काढता येतात. ‘ईपीएफओ’च्या पोर्टलवर लॉगीन केल्यानंतर ओटीपी व्हेरिफिकेशन होते. त्याची खातरजमा झाल्यानंतर नियमानुसार काही दिवसांत खात्यात पैसे जमा होतात.